माझी गोष्ट
माझ सर्व बालपण निसर्गाच्या सानिध्यातलं. जन्म कोकणातील चिपळूणचा. आजोळ जवळच परशुराम येथे. आईकडे वडीलोपार्जीत जमीन भरपूर. तिथे पणजोबांनी भरपूर कष्ट
घेवून मोठी बाग तयार केली होती. खाली कालूस्ते गावामध्ये भात शेती होती. बागेत हापूस व रायवळ आंबा, फणस, नारळ, पोफळी, कोकम, केळी, चिकू, काजू, करवंदे, पेरू, अननस, तसाच सोनचाफा, हिरवा चाफा, पांढरा चाफा, मोगरा, गुलाब वगैरे सुंदर वास
असलेली फुलझाडे व जास्वंद, कर्दळ, अशी अनेक प्रकारची फुलझाडे व
रानटी फुलझाडे, तसंच अनेक प्रकारच्या
भाज्या हि तिथे लावलेल्या असत. याशिवाय साग, कापूर, बिब्बा, ऐन, गोंद यासारखी अत्यंत उपयोगी
अशी मोठी वृक्ष वर्गातली झाडे लावलेली होती. झाडांना पाणी देण्यासाठी एक
मोठा हौद बांधलेला होता.
उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर त्यात आम्ही भावंड मनसोक्त
पोहत असु. झाडांच्या फांद्यांवर झोपाळा बांधून मस्त झोके
घेण, पत्ते खेळणं आणि आंबे, कोकम गोळा करणं हा आमचा उद्योग. संध्याकाळी
विसावा स्पॉट पर्यंत चालत जायचं, वाटेत रस्त्याकडे असलेल्या
झाडांवरच्या कै-या पडायच्या व त्या कापून तिखट मीठ लावून खायच्या हा आमचा पूर्ण २
महिन्यांचा कार्यक्रम ठरलेला असायचा.
घर अगदी मुंबई गोवा महामार्गावर असल्याने नातेवाइक, मित्र मंडळी कोकणात आल्यावर
तिथे हजेरी लावणारच. जवळचे असतील तर २ दिवस राहून मग पुढे आपल्या गावी जाणार हा
आजपर्यंत चा शिरस्ता. आणि आलेल्यांच स्वागर त्यावेली आजी आनंदाने करायची. आजहि
होते.
मुंबईत राहायला
सुरवातीला गोरेगाव पूर्वेला असलेल्या आरे मिल्क कॉलोनीत. १९४८ ते १९५३ साली वडील तिथे हेड क्लार्क असल्याने पूर्ण
आस्थापनेचे मुख्य होते. तिथली काही आठवण मला नाही कारण मी नुकताच
जन्मलो आणि ती जागा आम्ही सोडली . तिथली नोकरी वडिलांनी बदलल्यामुळे नंतर गोरेगाव पश्चिमेकडे असलेल्या पाटकर बंगल्यात ७ वर्षे. आता हा बंगला म्हणजे
जवळ जवळ दीड दोन एकर जागेत बांधलेला होता.
मुख्य बंगल्यात
मध्यभागी एक भला मोठा हॉल, त्याच्या चारही बाजूंनी मोठाल्या खोल्या, मागच्या बाजूला एक ओउट हाऊस, बंगल्याच्या चहु बाजूनी ४ फुट रुंदीची बाल्कनी व तिला नक्षीदार कठडा. पुढच्या
बाजूला खूप मोठी बाग,
मागेही बाग.
आवारात यायच्या रस्त्याच्या दुतर्फा बिट्टीची झाडे लावलेली. त्याची पिवळी फुलं खाली पडलेली
असत. म्हणजे त्या फुलांचा गालिच्याच अंथरलेला असे. वडील त्यावेळी सचिवालयात होते.
काही कौटुंबिक
कारणामुळे वडिलांनी हा बंगला सोडला व मग आम्ही पुन्हा गोरेगाव पूर्वेला असलेल्या
पांडुरंग वाडी मधील म्हात्रे चाळीत राहायला आलो. इथे मात्र आम्ही पुढची जवळ जवळ २६ वर्ष राहिलो. मध्ये १९७०
साली जानेवारीत माझे आजोबा ( आईचे वडील ) स्टेशन वर गाडीत चढताना हृदय विकाराचा तीव्र
झटका येऊन निधन पावले. पाठोपाठ वडिलांची तब्येत अचानक बिघडली व ७ एप्रिल १९७० ला
ऐन पाडव्याच्या दिवशी ते आम्हाला सोडून गेले. मी त्यावेळी १६ वर्षांचा होतो.
असो. चाळीत एकंदर १५ बिऱ्हाडे होती. घराच्या मागे व पुढे
दोन्ही बाजूला १५ x १० फुट अशी मोकळी जागा होती. तिथेही भरपूर झाडं
लावली होती. एकूणच निसर्ग नेहेमीच जवळ होता. त्यामुळे आरोग्य चांगले राहिले.
लग्न ठरायच्या
आधीच स्वतः च घर हवं म्हणून मालाडला ब्लॉक घेतला होता. लग्नानंतर तिकडे राहायला गेलो.
झाडांची हौस म्हणून सोसायटीतल्या लोकाना गोळा करून खूप झाडे लावली. पुढे ४ वर्षांनी मुलुंड
ला मुकाम हलवला. आता एक लक्षात येत कि नवीन जागा बघताना मी नेहमीच आजूबाजूचा परिसर
किती मोकळा व हवेशीर आहे याकडे मुद्दाम लक्ष देवून मगच हवी तशी जागा घेतली.
मुलुंडला तर सोसायटी खूप मोठी होती. आजूबाजूला खूप मोकळी जागा होती. बिल्डरने एक
बाग बनवून दिली होती. पुढे आम्ही सर्वांनी पुढाकार घेवून सोसायटीच्या आवारात २००
पेक्षा जास्त झाडं लावली. तिथेही मी पुढाकार व जबाबदारी घेवून हे काम केल. मी
आग्रहाने सर्वांना सांगून व समजावून बागेभोवती भरपूर फुल झाड लावली.
सहसा सर्व
लोकांचा असा विचार असतो कि सोसायटीत फुलझाडे कधी लावू नयेत. कारण फुले चोरतात, त्यावरून भांडणे होतात. मी मात्र वेगळाच
प्लान लोकांसमोर मांडला. उद्देश हा कि इतकी भरपूर झाडे लावायची कि
सर्वांना भरपूर फुले आपल्या घरी नेता आली पाहिजेत. सकाळी उठून परडी घेवून घरातील
स्त्रिया,
वयस्क माणसे
बागेत येतील,
त्या बागेतील
फुले घरच्या देवांसाठी घेवून जातील. त्यावेली एकमेकांची भेट होईल. वातावरण आनंदी
असेल. सर्वांनाच हि कल्पना आवडली.